Tuesday, July 9, 2013


॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥   
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ पञ्चदशोऽध्यायः - अध्याय पंधरावा । ।
। पुरुषोत्तमयोगः ।

आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें ।
वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूंचीं ॥ १ ॥
ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळी ।
भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों ॥ २ ॥
अनन्योदकें धुवट । वासना जे तन्निष्ठ ।
ते लागलेसे अबोट । चंदनाचें ॥ ३ ॥
प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपरें ।
लेवऊं सुकुमारें । पदें तियें ॥ ४ ॥
घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी ।
तिये घालूं जोडी । आंगोळिया ॥ ५ ॥
आनंदामोदबहळ । सात्त्विकाचें मुकुळ ।
तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥ ६ ॥
तेथे अहं हा धूप जाळूं । नाहं तेजें वोवाळूं ।
सामरस्यें पोटाळूं । निरंतर ॥ ७ ॥
माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण ।
करूं भोगमोक्ष निंबलोण । पायां तयां ॥ ८ ॥
इया श्रीगुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा ।
जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ॥ ९ ॥
ब्रह्मींचें विसवणेंवरी । उन्मेख लाहे उजरी ।
जें वाचेतें इयें करी । सुधासिंधु ॥ १० ॥
पूर्णचंद्राचिया कोडी । वक्तृत्वा घापें कुरोंडी ।
तैसी आणी गोडी । अक्षरांतें ॥ ११ ॥
सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ॥ १२ ॥
नादब्रह्म खुजें । कैवल्यही तैसें न सजे ।
ऐसा बोलु देखिजे । जेणें दैवें ॥ १३ ॥
श्रवणसुखाच्या मांडवीं । विश्व भोगी माधवीं ।
तैसी सासिन्नली बरवी । वाचावल्ली ॥ १४ ॥
ठावो न पवता जयाचा । मनेंसी मुरडली वाचा ।
तो देवो होय शब्दाचा । चमत्कारु ॥ १५ ॥
जें ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जें नागवे ।
तें अगोचर फावे । गोठीमाजीं ॥ १६ ॥
येवढें एक सौभग । वळघे वाचेचें आंग ।
श्रीगुरुपादपद्मपराग । लाहे जैं कां ॥ १७ ॥
तरी बहु बोलूं काई । आजि तें आनीं ठाईं ।
मातेंवाचूनि नाहीं । ज्ञानदेवो म्हणे ॥ १८ ॥
जे तान्हेनि मियां अपत्यें । आणि माझे गुरु एकलौतें ।
म्हणौनि कृपेंसि एकहातें । जालें तिये ॥ १९ ॥
पाहा पां भरोवरी आघवी । मेघ चातकांसी रिचवी ।
मजलागीं गोसावी । तैसें केलें ॥ २० ॥
म्हणौनि रिकामें तोंड । करूं गेलें बडबड ।
कीं गीता ऐसें गोड । आतुडलें ॥ २१ ॥